Wednesday, February 10, 2010

रतनगड

इतर सर्व किल्ल्यांप्रमाणेच रतनगडचे नाव खूप ऐकुन होतो, अर्थात ते तेथिल पावसाळ्यात फ़ुलणाऱ्या फ़ुलांमुळेच. फ़ुले बघायला जाणे काही जमले नाही, परंतु गडावर जायचे नक्की होतेच. अशाच एका रविवारी नेहेमीप्रमाणे मी, नाशिक आणि अम्या कॅफ़े गूडलकमधे बन-ऑमलेट, बन-मस्का, चिज-ग्रिल्ड्‍ ऑम्लेट आणि चहा पित टाइमपास करत बसलो होतो. तेव्हा अम्या किंवा नाशिकच्या डोक्यात रतनगडाचे वारे भिनले. आणि मग काय तिथे लगेच बसून प्लॅन नक्कि करण्यात आला. सोमवारी ऑफ़िसमधे आल्यावर नित्य-नेमाचे मेल आणि बग रिपोर्टस्‌ बघून झाल्यावर ट्रेकचे मेल केले. नचिकेतला मुद्दामच लूपमधे ठेवला :) मग भरपूर मेला-मेली हो‍उन कसे जायचे, कोण कोण येणार, जेवण, नाश्ताचा मेन्यु काय, कोणी काय काय आणायचे असे ठरून ३० जानेवारीच्या भल्या सकाळी ७ वाजता आम्ही अद्वैतच्या घरून मोहिम मुक्रर केली. शनिवारवाड्यापाशी अम्या आणि नाशिकला गाडीत भरले आणि खरा प्रवास सुरु झाला.

ट्रेकचे सदस्य म्हणजे मी, अद्वैत, नाशिक, अम्या, ऋशिकेष आणि मक्या असे ६ जण होतो. आम्ही ५ जण पुण्याहून तर मक्या डायरेक्ट कल्याणहून शेंडीला पोचणार होता, आणि मग तिथुन आम्ही पुढे रतनवाडीला जाणार होतो. प्रवास सुरु झाल्यावर १-२ तासने माझ्या आणि अम्याच्या पोटात भुकेने आरोळी ठोकली आणि मग आम्ही मस्तपैकी नाश्त्याला बसलो. भरपेट खाणे झाल्यावर परत प्रवासाला सुरुवात झाली. आम्ही पुणे - ओतुर - कोतुळ - राजूर - शेंडी - रतनवाडी असा रस्ता घेतला. ओतुरपासुन तसा रस्ता अगदीच छोटा आहे त्यामूळे गाडी जरा बेताच्याच वेगाने चाललेली होती. पण टाइमपास करायला पब्लिक भरपूर असल्याने काहीच प्रश्न नव्हता. भरपूर गप्पा-टप्पा सुरु होत्याच. मग मधे-मधे गरजेचे ब्रेक्स घेऊन आम्ही सुमारे १२ला शेंडीला पोचलो. शेंडी हे गाव भंडारदरा धरणाच्या अगदी लागून आहे. सर्व प्रदेश पाण्याच्या मुबलक उपलब्धतेमुळे अगदी गार आणि हिरवा होता. वाटेतच भंडारदरा धरणाची महाकाय भिंत दिसत होती. ती भव्य भिंत बघून छाती दडपली गेली होती. एव्हाना मक्यापण शेंडीला पोचलाच होता. १२-१ वाजलेले असल्याने आम्ही लगेचच एकमताने जेवायचा निर्णय घेतला. वांग्याचे भरीत , अंडा-भुर्जी आणि चपाती अश्या मेनुवर मस्त ताव मारला. थोडासं इकडे-तिकडे करून मग रतनवाडीला जायला निघालो.

रतनगड आणि त्याचे प्रतिबंब

रतनगडला जायचे म्हणजे रतनवाडीला पोचायला हवे. रतनवाडीपर्यंत व्यवस्थित गाडीरस्ता आहे. कोणत्याच ब्लॉगवर ही माहीती उपलब्ध नाही. योगायोगाने मला एक स्लाइडशो सापडला आणि त्यातून गाडीरस्ता असल्याचे समझले. जर तुम्हाला रस्त्याने जायचे नसेल तर बोटीचा पर्याय उपलब्ध आहे. पण त्या कोठून मिळतात त्याची कल्पना नाही, आणि जरी बोट घेतली तरीही रतनवाडीच्या बरेच अलिकडे उतरावे लागते अणि तेथुन मग चालत जावे लागते. त्यापेक्षा जीपने गेलेले जास्त बरे. शेंडी ते रतनवाडी हे अंतर फ़क्त २०-२२ कि.मी आहे, गाडीने पोचायला साधारण ४० मिनिटस लागू शकतात कारण रस्ता छोटा आहे आणि वळणा-वळणांचा आहे.

आम्ही सुमारे २-२.३० पर्यंत रतनवाडीला पोचलो. तसे गाव छोटेसेच आहे, पण इथे अमृतेश्वराचे एक अतिसुंदर आणि आखिव-रेखिव मंदिर आहे. ह्या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी शैलीमधले आहे. त्यामूळे हे संपुर्ण बांधकाम काळ्या दगडात केलेले आहे. काळा-कुळकुळीत दगड पण त्यावर इतके सुंदर कोरीव काम पाहून नवल वाटते. प्रत्येक काम अगदी उच्च दर्जाने संपविलेले होते. प्रत्येक कोपरा, आकार अगदी सुस्पष्ट आणि सुबक दिसत होता. कळासावरील काम तर अप्रतिमच आहे. खरं सांगायच तर कळस हा कळसाच्याच छोट्या हुबेहुब प्रतिकृतींनी बनवलेला आहे. मंदिराचा प्रत्येक खांब सुद्धा अप्रतिम आहे. मंदिराचे आवर एकदम प्रशस्त आणि स्वच्छ आहे आणि मुख्य म्हणजे गावकऱ्यांनी तो स्वच्छ ठेवला आहे. मंदिराचा जिर्नोद्धार झाला असण्याची शक्यता आहे, कारण सिमेंटचे थोडेसे काम केल्याचे दिसत होते. मंदिराच्या जवळच एक भव्य कुंड आहे, हे कुंडसुद्धा त्याच कालावधीमधे बांधलेले असावे कारण कुंडाला सुबक अशी संरक्षण भिंत बांधलेली आहे, आणि अगदी सुबक पायऱ्या खोदलेल्या आहेत. तेव्हा त्या कुंडाची स्वच्छता सुरु होती. सगळ्यांचे मंदिराचे भरपूर फोटोसेशन झाल्यावर आम्ही गडाकडे जाण्यासाठी सॅक पाठीवर लादून निघालो.
मंदिराचा सुबक कळस
अमृतेश्वराचे मंदिर
गडाच रस्ता तसा सोप्पा आहे, काही भल्या लोकांनी पांढरे बाण काढून रस्ता अधोरेखित केलेला आहे. रस्ता ओढ्याच्या डाव्या कडेने जातो आणि नंतर पुढे ओढा उजवीकडे ओलांडून गडाची वाट सुरु होते. आम्ही साधारण ३.३०ला चालायला सुरुवात केली, तसा सगळा रस्ता दाट झाडांखालून जाअ असल्याने उन अजिबात जाणवत नव्हते आणि म्हणूनच थकवा जरा कमीच होता. १-२ चढ झाल्यावर मी नेहेमीप्रमाणे थोडा ढेपाळलो :) मग थोडा दम खाऊन मी चढायला सुरुवात केली, मग मात्र मी सतत न थांबता चालत होतो. माझे चालणे म्हणजे ट्रकसारखे झाले होते, फ़र्स्ट गिअरवर हळूवार पण न थांबता माझे चालणे सुरु होते. तसा रस्ता पुर्ण चढाचा आहे, पण जास्त दगड/उंचवटे नाहीत त्यामुळे दम कमी लागत होता. सगळेजण तसे न थांबता आपल्या आपल्य वेगाने गड चढत होते. चढत चढत आम्ही शिड्यांपर्यंत पोचलो.
शिड्या

गणेश दरवाजा
शिड्यांची अवस्था पाहून जरा धडकीच भरली पण नंतर चल रे काही होत नाही असे ठरवून शिड्यांकडे जाऊ लागलो. मग तिथे जरा सगळ्यांनी थोडा दम खाऊन घेतला. शिड्या संपल्यावर लगेचच दरवाजा असल्याने सगले निर्धास्त होते. मग परत एकदा तिथुन दिसणाऱ्या दृश्याचे भरपूर फोटोसेशन करून आम्ही शिड्या चढून दरवाज्यात पोचलो. पहीला दरवजा म्हणजे गणेश दरवाजा. शिडी संपल्यावर एक चिंचोळा चढ चढला की आपण दारात पोचतो. दरवाजा अतिशय उत्तमपणे कोरलेला आणि चांगल्या स्थितीमधे आहे. त्यावरचा कोरीवपणा अजूनही छान आहे. अगदी वरच्या बाजूला गणपतीच्या मुर्त्या कोरलेल्या दिसल्या. मग थोड्या दगडात कोरलेल्या पायऱ्या लागल्या, त्या चढून हेल्यावर डावीकडे १ दरवाजा आणि बुरुज दिसतो, तर उजवीकडे २ गुहा आहेत. एका गुहेत एक मुर्ती आहे, दुसरी गुहा रहाण्यासाठी उपयोगी आहे. ही गुहा बरीच मोठी आहे आणि सुमारे २०-२५ लोकं अगदी सहज मावू शकतात. आम्ही गुहेपाशी पोचलो तेव्हा एक ग्रूप आणि माकडं ह्यांचे युद्ध सुरु होते :) झालं असं की त्या मुलांनी त्यांचे नाश्याचे सामान, चहाचे सामान सॅकबाहेर काढून ठेवले होते आणि नंतर गुहेचे दार बंद करून पाणी भरायला मुले निघुन गेली. पणा माकडांची छोटी पिल्ले दरवाजाच्या फ़टीतून आत शिरली आणि बाहेर ठेवलेले सगळे खायचे सामान पळवले. त्या मारामारीमधे आम्हाला फ़ारसा रस नव्हता. गुहा धुराने पुर्णपणे भरलेली होती, तिथे १० मिनिटस श्वास घेणं अवघड झालं होतं म्हणून मग आम्ही गुहेपेक्षा तंबूमधेच रहायचे ठरवले.
गडावरील गुहा
एव्हाना ६ वाजले होते आणि सुर्यनारयण लाल, नारिंगी रंग उधळत झपाट्याने खाली जात होते. वरती सरव गवत जाळलेले होते त्यामूळे सर्व उजाड झाले होते. वरील एका ग्रूपकडून असे कळाले की जळणासाठी कोरडी लाकडेच मिळत नाहीयेत, बाहेर रहायच म्हणजे शेकोटी पाहीजेच कारण सुर्यास्तानंतर लगेचच गारवा जाणवत होता. मक्याच्या पाय दुखावला गेला होता, म्हणून मग मक्या, ऋशिकेष, अद्वैत आणि अम्या तंबू टाकायला थांबले. मी आणि नाशिक लाकूड मोहीमेवर निघालो. एक वठलेले झाड दिसत होते परंतु त्याच्या फ़ांदीत दोरी अडकवणे काही जमेना. एक तर चांगलाच उतार होता त्यामूळे त्या झाडाभोवती फ़िरताना जरा जपावे लागत होते. शेवटी नाशिक झाडावरच चढला पण ते वाळलेले असल्याने अजून वर चढण्यात धोका होता आणि तिथुन दोरी टाकली असती तरी खेचणे शक्य नव्हते. म्हणून मग आम्ही त्याचा नाद सोडून आजुबाजुच्या झुडुपातील वाळलेली लाकडे काढू लागलो, ढीग जमा हो‍ऊ लागला. मग अम्या, ऋशिकेष , अद्वैतपण आले. आम्ही सर्वांनी मिळून लाकडे आणि पेंढा तंबूपर्यंत आणला.
तंबुची मस्त जागा
एक रम्य संध्याकाळ


तंबू टाकायला आम्हाला एकदम झक्कास जागा मिळाली होती. जागा एकदम स्वच्छ आणि सपाट होती, थोडा उतार होता. बाजूलाच कातळात खोदलेल्या टाक्या होत्या आणि एका बाजूने थोडा मोठा उंचवटा होता, बाकीच्या दोन बाजू मोकळ्या होत्या. तिथे आमच्या आधी कोणीतरी राहीलेले असावे त्यामूळे त्यांनी तयार केलेली चूलपण आम्हाला आयतीच मिळाली. सगळे स्थानापन्न झाल्यावर चहाची टूम निघाली. मग मी आणि नाशिकने स्टोव जोडायला सुरुवात केली आणि बाकी मंडंळी पाणी आणायला बाहेर पडली. चुलीचे दगड वापरून आम्ही स्टोवसाठी आडोसा तयार केला आणि रॉकेल भरून स्टोव तयार ठेवला. मक्यने एकिकडे मिल्क पावडरपासून दुध बनवण्याचा उद्योग सुरु केला. पाणी फ़ारसे चांगले नाही असे लक्षाता आल्यावर ते गाळून आणि उकळायचा बेत केला आणि स्टोव सुरु केला. भन्नत गार वारे सुटले होते त्यामूळे स्टोव काही केल्या नीट चालेना मग शेवटी आम्ही रिस्क घेऊन स्टोव तंबूमधे घेतला :) आणि त्यावर पाणी उकळायला ठेवले, ह्या खटाटोपात ७-७.३० वाजले आणि त्यापुढे चहा म्हणजे वेळ गेला असता. मग मक्याने इंस्टंट कॉफ़ी बाहेर काढली आणि मग आम्ही सगळ्यांनी मस्त गारव्यात गरमा-गरम कॉफ़ीची मजा घेतली. पोट थोडेसे गरम झाल्यावर मग सगळ्यांचे डबे उघडले आणि मग भरपूर खाणे झाले.

भुर्जी टाईम....

जरा वेळ कपडे बदलणे, सॅक उचकणे अशी नित्याची कामे होता होता ९ वाजले आणि आम्ही जेवणाची तयारी सुरु केली. अंडा राइस वेळ कमी असल्याने आम्ही रद्द केला आणि त्याऐवजी भुर्जीपावाचा बेत ठरवला. त्यानुसार मग सुऱ्या बाहेर निघाल्या आणि कांदा-टोमेटोची कत्तल हो‍ऊ लागली, बघता बघता कांदा-टोमेटोचा ढीग लागला आणि सगळ्यांनी त्यांच्या कत्तलीवर ढसढसा रडून घेतले. मसाले, तेल, कढई, उलथण आणि चिमटा अशी सामग्री घेउन मी तयारीला लागलो. स्टोव जरा जास्तच त्रास देत होता, वॉशर खराब झाला होता त्यामुळे पंप नीट बसत नव्हता,आणि फ़्लेम सारखी कमी होत होती, माझ्या डोळ्यांची पक्की जळजळ होत होती. शेवटे ऋशिकेषने उलथणे हातात घेतले आणि भुर्जीच्या लढाईत उडी घेतली. बाहेर अतिशय मस्त दृश्य होते, चंद्र चांगलाच मोठ्ठा दिसत होता, आणि त्यामूळे त्याचा अगदी लख्ख प्रकाश पडला होता. सगळ्या दऱ्या आणि डोंगर चंद्रप्रकाशात फ़ारच छान दिसत होते. अमितच्या दुर्बीणीमधून चंद्रबिंब बघत होतो, मग शुक्राची चांदणी बघायचा प्रयत्न केला पणा हात काही स्थिर राहत नव्हता. मग तो नाद सोडून सगळे नाईट फोटोग्राफीच्या मागे लागले. लख्ख चंद्रप्रकाशात चांगले फोटो येत होते. बाजूच्याच बुरुजावर १ ग्रूप राहीला होता, आणि त्यांनी शेकोटी पेटवली होती. त्या शेकोटीमुळे तो बुरुज उजळून गेला होता, बुरुजावरील भगवा त्यामुळे अजूनच छान दिसत होता, फोटो काही काढता नाही आला. आणि तो क्षण आला......भुर्जी तयार झाली :) लगेचच सगळेजण त्यावर ताव मारू लागलो.
मस्त थंडी, लख्ख चंद्रप्रकाश, कड्यावरील झाड आणि उबदार शेकोटी,
एक सुंदर पहाट

सगळं आवरून मग शेकोटी पेटवली, एव्हाना हवेतील गारवा वाढला होता. रात्रीचे १०-१०.३० वाजले होते आणि वारे पण चांगलेच सुटले होते त्यामूळे सगळ्यांना हुडहुडी भरली होती. शेकोटीच्या बाजूने आम्ही सगळे बसलो आणि मस्त गप्पा मारता मारता शेकोटीए धडधडून पेटली, मग त्यात कांदे आणि बटाटे भाजण्याच उद्योग सुरु केला. १ डजनभर बटाटे तरी रिचवले असतील. नंतर परत एकदा शेकोटीच्या प्रकाशात फोटोसेशन पार पडले. १२.३० - १ला फ़ायनली शेकोटी विजवून सर्वजण तंबूत घुसलो आणि झोपेच्या स्वाधीन झालो. २०० कि.मीचा प्रवास आणि त्यानंतर लाकडासाठी केलेले उप्द्व्यापामूळे सगळ्यांना लवकरच झोप आली. मीसुद्धा झोपण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होतो पण ४ जणांच्या तंबूनधे आम्ही ६ जणं होतो, त्याता आमच्या मोठाल्या सॅकने जागा अजूनच पॅक झाली होती. मला १-२ तास झोप लागली असेल, ४.३०च्या सुमारास मला जाग आली आणि नंतर काही झोप येत नव्हती. अद्वैतसुद्धा जागाच होता. मग आम्ही दोघे बाहेर पडलो आणि बाकीचे जरा व्यवस्थित सरकून झोपले. एव्हाना चंद्र मावळतीच्या मार्गावर असल्याने टाक्यांच्या कातळावरील झाडामागे गेला होता. आम्ही दोघांनी शांत झालेली ती शेकोटी परत मस्त पेटवली, त्यासमोर चटई टाकली, आणि बऱ्याच महिन्यात न ऐकलेली गाणी लावून बाहेर बसलो. पहाटेचे ते शांत वातावरण, समोरच मस्त पेटलेली शेकोटी आणि जोडीला निवडक गाणी, त्यामूळे एक मस्त मूड तयार झाला होता, मी चादर पांघरून त्या शेकोटीची मजा घेत होतो. मग झाडामागे लपलेल्या चंद्राचे आणि त्या शेकोटीचे भरपूर फोटोसेशन केले. ६.३०ला सगळेच जागे झाले, आणि आम्ही सगळेजण बुरुजाच्या पुढील खंदकांपाशी सुर्योदय पहायला गेलो.
सुर्यनारयणा वंदन करतो तुला

ऋशिकेष, अद्वैत, मक्या, नाशिक, मी आणि अम्या
गडाखालील जंगल जागे होत होते, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकु येत होता. हळू-हळू सुर्यनारयण नारिंगी रंग घेउन वर येउ लागले, त्यांचे फोटोज काढून आम्ही परत तंबूमधे परतलो आणि चहाची तयारी सुरु केली, वाऱ्याचा त्रास होणारच हे माहीत असल्याने आधीच स्टोव आय पेटवून अमितने चहाचे आधण ठेवले, आलं आणि गवती चहाची भरपूर भरमार केली गेली. जरा वेळाने मस्त वाफ़ाळता चहा तयार झाला आणि आम्ही सगळ्यांनी अमितला दुवा देत २-२ भांडीभरून चहा घेतला. गडावर सकाळी केलेला चहा आणि मित्रांची सोबत हा प्रकारच अफ़लातून आहे. चहा पिउन होतोय तर लगेचच ऑमलेटची तयारी सुरु झाली :) मग साग्रसंगित ऑमलेट खाल्ली आणि सामान आवारायला सुरुवात केली. आदल्या दिवशी गडावर यायला उशिर झाल्याने आम्ही काहीच पाहीले नव्हते, म्हणून मग पटा-पटा आवरून आम्ही गड बघायला निघालो. गड तसा अगदीच उजाड आहे. ३-४ दरवाजे आणि १ बुरुज सोडला तर गडावर काहीही नाही. पाण्याची खोदीव टाकी आणि २-३ खंदक पण आहेत. जिथुन सुर्योदय पाहीला ती जागा कमालीची मस्त आहे. अगदी कड्याच्या टोकापाशी गेल्याशिवाय तळ दिसणार नाही असे डोंगर उभे आहेत, सगळे डोंगर असे मस्त ताशिव आणि ओवरलॅपिंग दिसत होते, तेथुन आम्ही मग नेढे बघितले. नेढेपण मस्त आहे अगदी भरपूर लोकं सहज मावू शकतील इतके मोठे आहे. आम्ही मग नेढ्यातून उतरून कल्याण दरवाजाने उतरायचे ठरवले.
डोक्यावर नेढे पेललेला अम्या..

खुट्याचा डोंगर
कल्याण दरवाज्याची वाट अचाटच आहे, अगदी खोल उतार असलेली वाट आहे. दोन्ही बाजूंनी उंच दगडाची नैसर्गिक भिंत आणि त्यात खोदलेल्या उंच पायऱ्या. इथुन चढायच म्हणजे गुढग्याची वाट लागू शकते. उतार अगदी तिव्र आहे आणि पायऱ्या अरुंद आहेत, त्यामूळे तोल जाण्याचे प्रचंड चान्सेस आहेत. चुकुन जास्त पुढे झुकला की लगेच आउट... :) पण अवघड अजिबात नाही. कल्याण दरवाजामधून फ़ार मस्त द्रुष्ये दिसतात. पहीले तर तिव्र उतार असलेल्या पायऱ्या आणि खोल दरी दिसते, पायऱ्या संपल्यावर डोंगराला उजवीकडे खेटूनच चालावे लागते कारण डावीकडे दरी आहे, आणि पाय चुकला की लगेच आउट. पावसाळ्यात जरा जास्त काळजी घेणे गरजेचे आहे कारण पायऱ्यांवरचे शेवाळ खूप त्रास देइल आणि इथे पाय सरकला की सगळं संपंल. कल्याण दरवाजाची वाट म्हणजेच खुट्याची वाट आहे. एका अंगठ्यासारख्या दिसणाऱ्या महाकाय दगडाच्या डोंगराच्य बाजूने ही वाट जाते. नंतर वाट जंगलात उतरते आणि मग बऱ्यापैकी व्यवस्थित आहे, परंतु उतार तसा जास्त आहे त्यामुळे पावसाळ्यात चिखल झाला की त्रास हो‌उ शकतो. अर्धा गड उतरुन झाल्यवर एक वाट लागली. वाट उजवीकडून येउन डावीकडे जात होती. आम्हाला डावीकडे जाणार बाण दिसला पण आम्ही द्विधा मनस्थितीमधे होतो की डावीकडे की उजवीकडे..कारण दोन्ही वाटा अगदी व्यवस्थित दिसत होत्या.
कल्याण दरवाजापुढील वाट
कल्याण दरवाजा पायऱ्या
शेवटी आम्ही बाणाच्याच दिशेने जाय्चे ठरवले आणि निघालो, आम्ही निघताना कशाला ओझे म्हणून गडावरून पाणी घेतले नव्हते (अर्थात शुद्ध मुर्खपणा केला). तसे माझ्याकडे अर्धी बाटली पाणी आणि अद्वैतकडे अर्धी बाटली पाणी होते पण आम्हाला काय माहीत की आम्ही वाट चुकणार होतो :) तर झाले असे की आम्ही डावीकडे चालायला सुरुवात केली, ती वाट एका डोंगराच्या बाजूने जात होती आणि अगदी सरळ होती, गाव डावीकडे दिसत होते पण अर्धा-पाउण तास चालूनही वाट डावीकडे उतरायला तयारच नव्हती. वाट बांधून काढल्यासारखी होती, एका बाजूने दगडांची भिंत होती आणि वाटेवर गुरांचे शेण दिसत होते. वाट वापरातली होती आणि ती कोणत्या तरी गावात जात असणार हे नक्की होते पण कोणत्या गावात हे माहीत नव्हते. उन तर प्रचंड वाढले होते कारण १२ वाजलेले होते, त्यात पाणी नाही. आम्ही खाली जाऊन जेवायचं म्हणून फ़क्त नाश्ता करून निघालो होतो, त्यामूळे एव्हाना आम्हाला भूक लागली होती. मग सगळे एका झाडाखाली थांबलो, नाशिक आणि ऋशिकेष थोडेसे पुढे जाउन वाट उतरते का हा शोध घ्यायला गेले, नाशिकला वाट डोंगराला वळसा मारून जाताना दिसली पण तीथून किती पुढे ह्याचा काही अंदाज लागत नव्हता, ऋशिकेषच्या हातीपण निराशाच आली. चढताना आम्ही गडाच्या डाव्या अंगाने चढलो होतो, तो सर्व रस्ता आम्हाला दिसला होता, पण हा रस्त उजव्या अंगाने होता पण उतरत नव्हता, त्यामूळे आमची खात्री झाली की आपण चुकलोय. मग आम्ही जिथे डावीकडे वळालो तिथे परत जायचे ठरवले आणि अर्धा तास पायपिट करत तिथे पोचलो आणि उजवीकडच्या वाटेवर निघालो. ५-१० मिनिटस्‌ मधेच एका मेंढपाळाने डावीकडच्या टेकाडावरून आवाज टाकला "अरे पोरांनो तिकडं कुट चालला...तिकडची वाट घावायची नाही तुमाला..रतनवाडीला अस्स डावीकडून, जंगलातून उतरून जायचं" अस ऐकल्यावर आम्ही "च्यायला काय वेडेपणा आहे राव...अता परत उल्ट जायच...आइचा घो..." इत्यादी बोलून परेड पिछेमूड केलं आणि त्या मेंढपाळाच्या दिशेने चालायला सुरुवात केली.
कल्याणा दरवाजा पायऱ्या आणि खोल दरी
कल्याण दरवाज, नाशिक आणि मी, अजून एक यशस्वी ट्रेक
त्याच्या जवळ गेल्यावर कळाल की तो वेगळ्याच टेकडीवर आहे आणि तिथे पोचता येणे शक्य नाही. त्यालाच थोड्याश्या खाणा-खुणा विचारून आम्ही डावीकडे खाली उतरत रहायचा निर्णय घेतला. आम्ही सगळ्यात पहीले एक पठार निवडले आणि त्या पठारावर पोचायचे असा निर्णय घेतला आणि मग पायवाट शोधू लागलो, जिथे पायवाट नव्हती तिथे तोडा-तोडी करून आमची पायवाट तयार करणे सुरु होते. जरा वेळानी आम्हाला एक उताराची आणि वापरातली पायवाट मिळाली. जरावेळा चालल्यावर आम्हाला १ लाकूडतोड्या पोरगा भेटला, त्याला वाट विचारली तर त्याने फ़क्त हातवारे करत आहे वाट असे सांगितले आणि भरकन निघून गेला. पण तिथे २ वाटा होत्या, परंतु दोन्ही वाटा कुठेही जातील असं वाटत नव्हतं, शेवटी अमित डाव्या बाजूने झाडीत घुसला आणि वाट तयार करू लागला, आम्ही त्याच्यामागे घसरत-पडत जात होतो. शेवटी एकदाची आमची परिक्षा संपली आणि परत पायवाट मिळाली.ह्या पायवाटेने मात्र आम्हाला व्यवस्थित खाली पोचवले, खाली पोचल्यावर सगळं काही टाकून पब्लिक ओढ्यामधे शिरली आणि पाणी पिउन मस्त पाय सोडून बसले. शेवटी आम्ही एकदाचे खाली पोचलो होतो, जरा आराम झाल्यावर आपण कुठे चुकलो अशी चर्चा करत करत परत मंदिरापाशी पोचलो. बाजूच्या पोऱ्याला १२ लिंबू सरबताची ऑर्डर सोडून आम्ही सगळ्यांनी जवळच्याच विहिरीवर मस्त आंघोळ केली. पाणी अस काही गार होतं की श्वास घेताना भंबेरी उडत होती, पण त्या गार पाण्याने थकवा पळून गेला आणि एकदम फ़्रेश वाटू लागलं. मग मस्त लिंबूसरबत घेतले आणि रतनगडला अच्छा करत आमचा परतीचा प्रवास सुरु झाला आणि रात्री सुमारे १.३० ला घरी पोचलो :)

गडाची थोडक्यात माहीती:
रतनगड, सुमारे ४५०० फ़ूट उंची, वर्षभरात केव्हाही जाता येउ शकते पण पावसाळ्यात जरा जपूनच. राहायची आणि खायची सोय रतनवाडीला हो‌उ शकते. गडावर गुहा आहे, पण गुहा भरली तर आडोसा काहीही नाही त्यामूळे खाली राहणे जरा चांगला पर्याय आहे. गडावर पाणी आहे पण तितकेसे चांगले नाही त्यामूळे खालूनच पाणी तसेच काकडी, टॉमेटो इत्यादी नेणे उत्तम. उन्हाळ्यामधे गडावर पाणी अतिशय कमी उपलब्ध असेल त्यामूळे उन्हाळ्यामधे वर राहणे टाळलेले बरे.तसे गडावर काहीही उरलेले नाही, परंतु मित्र बरोबर असताना काय फ़रक पडतो :) रतनवाडीला जाण्यासाठी आधी शेंडीला यावे लागते. पुण्याकडून यायचे असेल तर पुणे-संगमनेर-शेंडी-रतनवाडी(२२४ की.मी) असा रस्ता आहे. कल्याण-मंबई बाजूने यायचे असेल तर कसारा-इगतपूरी-घोटी-शेंडी असे यावे.

बाकीचे फोटोज:-

Labels: , , , , , , , ,

2 Comments:

At 6:31 PM, Blogger Sandeep said...

waat chukalo mhanun ch jara maja ali.. :D paNya shivay kasli awastha hoti saglyanchi.. tari nashib uun far navta :P
ani khaychi pyaychi tar eish ch hoti.. chyayla.. sakali 10 paryant fakt khat ch hoto.. :P
anyways.. all in all.. mast trek zala except makya chi injury ani yetanacha uushir ..
@makya HK physiotherapist kade jaa !! next trek la fit payje !

 
At 11:36 AM, Blogger abhiminde said...

mast blog ahe re.. especially tujha to photo, bhurji karntana.. kaay expressions ahet.. even m inspired to start blogging :) keep up the good work.

 

Post a Comment

<< Home