Tuesday, September 22, 2009

तोरणा-गडांचा आणि फ़ुलांचा राजा.

तोरणा-गडांचा आणि फ़ुलांचा राजा.
आगबोटी सारखा दिसणारा तोरणा उर्फ़ प्रचंगड

तसं तोरण्याला आम्ही जुलैमधेच जाऊन आलो होतो, पण तेव्हा फ़क्त धुके-ढग आणि पाउस ह्याशिवाय काही दिसलेच नव्हते.असं ऐकलं होतं की तोरण्यावर सप्टेंबरमधे फ़ुलांचा सिझन असतो. बऱ्याच लोकांच्या ब्लॉगवर सुद्धा अप्रतिम असे फोटोज पाहीले होते.त्यामुळे मी ठरवलेच होते की काहीही झाले तरीही सप्टेंबरमधे तोरण्याला भेट द्यायचीच, त्यामुळेच गेल्या रवीवारी तोरण्याचा योग जुळवून आणलाच अर्थात मी ह्याचे श्रेय मक्याला देइन, कारण तो आला नसता तर मला घरीच बसावे लागले असते.


रस्त्याच्या बाजूची काही दृश्ये

रविवारी सकाळी ६.२०ला मी मक्याला धनकवडीवरून बाईकने उचलले आणि आम्ही सिंहगड रोडकडे निघालो, खानापूर फ़ाट्याला वळून पुढे निघालो. पावसाळ्यात ह्या भागाच पूर्ण कायापलट झालेला असतो. सगळ्या जमीनीवर म‍ऊ लुसलुशित गवताची दुलई पसरवल्यासारखी वाटत होती, जमीनीवर माती दिसतच नव्हती जिथे पहावे तिथे डोळ्यांना सुखावणारा हिरवागार रंग होता. मग लगेचच आम्ही पाबे खिंडीचा रस्ता पकडला, पाबे घाट तर अप्रतिम आहे, दोन्ही बाजूंनी झाडे, मधेच हिरवीगार मैदाने, धुव्वा वाहणारे ओढे, किलबील करणारे पक्षी, निरनिराळी फुलपाखरे, सगळा परीसर कसा स्वप्नवत सुंदर आहे. एका वळणावर छान पिवळ्या रानफुलांनी आमचे स्वागत केले, मग मी आणि मक्याने लगेचच कॅमेरे काढून फोटोज काढायचा सपाटा लावला. मनासारखे फोटोज झाल्यावर परत निघालो, मग जवळ जवळ प्रत्येक १-२ वळणांवर आम्ही थांबून फोटोज काढत होतो. खिंड पार केली आणि आम्ही चकीत झालो, प्रत्येक डोंगरावराच्या हिरव्या दुलईवर पिवळ्या रंगाची नक्षी केलेली होती. तसेच सर्व परीसरात विविधरंगी फुले उमललेली होती.परत अधाश्यासारखे आम्ही भरपूर फोटो काढले आणि पुढे निघालो.





खिंडीमधील काही दृश्ये

खिंडीची उतरण संपल्यावर डावीकडे एक मोठ्ठे पठार लागते, ते पठार पाहीले आणि करकचून डिस्क ब्रेक मारले. काय दृश्य होतं ते, शब्दात वर्णन करणचं खूप अवघड आहे. संपुर्ण पठारवर फुलांचे आच्छादन होते, नजर जिथे जाइल तिथे फुलेच फुले, कोणत्याही दिशेला पहा फ़क्त फुलेच फुले. अनुष्का बरोबर असती तर तीने तिथेच मुक्काम ठोकला असता, आणि मलासुद्धा तिचे मनमोकळेपणे फुलांमधे फ़िरतानाचे फोटोज काढता आले असते, बघू पुढच्या शनिवार-रवीवार मधे जमवतो आणि तिला घेउनच जातो. सगळी एकाच प्रकारची परंतु इतकी फुले मी कधीच पाहीली नाहीत. तिथेही खूप फोटोज काढले, एव्हाना आम्हाला हळू-हळू तोरण्यावर तर कीत्ती फुले असतील ह्याची कल्पना यायला सुरुवात झाली होती. घड्याळात ९ वाजत आले होते आणि पोटात भुकेने १२ वाजले होते, जड मनानेच आम्ही त्या सुंदर पठाराचा निरोप घेतला आणि पुढच्या १० मिनिटसमधे वेल्हे गावात पोचलो. तिथेच ब्रेड आमलेट खाल्ले, १ पार्सल घेतले :) आणि ९.३० वाजता गड चढायला सुरुवात केली.
फुलांनी भरलेले पठार


गडाच्या वाटेवरील काहे दृश्ये

वाटेवरच्या प्रत्येक डोंगरावर फुले उगवलेली होती, उन अगदी लख्ख होते, त्यामूळे त्या चमचमत्या हिरव्या गवतावर ती अगणीत पिवळी फुले फ़ारच सुंदर दिसत होती. मधे मधे तेरड्यानेपण रंगाची उधळण केली होतीच, निवांत चालत फोटो काढणं चालूच होतं. मी आणि मक्या इतकी फुले पाहून हरखून गेलो होतो. पहीला टप्पा पार पडल्यावर मात्र सर्व फुले गायबच झाली. उन चांगलेच जाणवत होते, तोरण्याची वाट तशी डोंगरमाथ्यावरूनच जाते, त्यामूळे वाटेवर झाडे-सावली हा काहीही प्रकार नाही. उन चांगलेच होते आणि त्यात भर म्हणजे जमीनीतून बाहेर येणारा दमटपणा भयानक होता.झालं माझी दमछाक सुरु झाली :P मला माहीत नाही परंतु हल्ली माझ्या छाती हल्ली अचानक भरून येते, म्हणजे कोणीतरी माझी छाती दाबून ठेवलीये असचं वाटतं, हा प्रकार पहील्यांदा मला मागच्या राजगड ट्रेकच्या वेळेस आला, पण तेव्हा फ़ार जास्त उन होते आणि चढपणा बराच होता, तुलनेने तोरण्याच्या सुरुवातीला इतका चढ अजिबात नाहीये, असो मला डॉक्टरांना हे सांगायला हवे. संपुर्णवाट डोंगराच्या बाजुनेच असल्याने आम्ही यथेच्छ भाजले गेलो, दमलो म्हणून बसायची सोयच नव्हती कारण ११ वाजलेले आणि सुर्यदेव बरोबर डोक्यावर यायल सुरुवात झाली होती, बसून एनर्जी घालवण्यापेक्षा चाललेले बरे म्हणून मग वाटचाल सुरुच होती. मधे-मधे जिथे सावली मिळेल तिथे माझे डोके घालून दम खाऊन घेतला, तसा बाकी पर्याय काहीच नव्हता मग तुर्तास मी सुर्यदेवांना दया दाखवायची याचना केली, आणि त्यांनीही आम्ही वर पोहचेपर्यंत ढगाआड जाऊन ती मान्य केली. बिनी दरवाजाने आत गेल्याक्षणी आम्हाला अत्यानंद झाला, जय भवानी - जय शिवाजी अश्या ललकाऱ्या उठल्या. परत एकदा तोरण्यावर यशस्वीपणे चढाई करण्यात आम्ही यशस्वी झालो.


बिनी दरवाजाच्या पुढची वाट

बिनी दरवाज्यातून पुढे जाताना मात्र फ़ुलांच्या तोरण्याने आमचे स्वागत केले. वाटेच्या दोन्ही बाजूंनी तेरड्याने आणि इतर रानफ़ुलांनी रंगांची उधळण केली होती. त्या बेलाग तटबंदीच्या काळ्या-कुळकुळीत पाषाणांच्या पार्व्शभूमीवर ती रंगांची उधळण अजूनच खुलून दिसत होती, परत कॅमेरे बाहेर निघाले आणि फोटोजचा पाउस पाडला. मग २ऱ्या दरवज्यातून आत गेलो, तिथेच एका गावकऱ्याकडून मस्तपैकी लिंबूसरबत घेतले. लिंबूसरबत घेतल्याक्षणी आमचा थकवा दुर पळून गेला.आजू-बाजूला, वर-खाली चहूकडे फुलेच-फुले फ़ुललेली होती, पिवळी, निळी, पांढरी, गुलाबी, जांभळी इत्यादी. आणि फुलांचे ताटवे काय म्हणणार, फुलांचे रानच म्हणायला लागेल इतकी फुले फ़ुलली होती. मला १ बरं वाटलं की जे ऐकलं होतं, पाहीलं होत ते खरच तसचं आहे ह्याची मला प्रचिती आली. मुख्य म्हणजे इतकी मस्ती करून गडावर आलो त्याचे पुरेपूर सार्थक झाले. मग आम्ही मेंगाई देवीच्या मंदिरात गेलो, तिथे देवीला नमस्कार केला, आणि छान जेवून घेतले. मग तिथेच १०-१५ मिनिटे आराम केला आणि मग झुंझार माची पहायला गेलो.



झुंझार माचीवरील काही दृश्ये

माचीच्या वाटेवर परत तशीच फुले दिसून आली, तस म्हणायचं तर पुर्ण गडावर फुले होतीच. माचीची शिडी पाहीली, पण आम्ही काही खाली उतरलो नाही,बाजूच्याच बुरुजावरून माचीचे काही सुंदर फोटोज काढले, दरीत वाकून पाहीले तर संपुर्ण दरीसुद्धा फुलआंनी भरलेली होती. तिथुन मग मागे फ़िरलो, ढग दाटून आलेले होते, पण पाउस पडत नव्हता. तिथून आम्ही बुधला माचीकडे जायला सुरुवात केली. ढासळलेल्या बुरुजापासून जपत आम्ही निघालो, संपूर्ण वाट ढगांनी वेढली गेली होती. मुख्य समस्या वाटेवरच्या झुडूपांची होती. झुडूपे खूप वाढली होती त्यामूळे पायाखालचा रस्ता दिसणेच मुश्किल झाले होते, मधेच घसरत, धडपडत आम्ही चालत होतो. बुधला माची गडापासून बरीच लांब आहे, आम्ही २० मिनिटस चालत होतो पण रस्ता संपायलाच तयार नव्हता, एक शंका आली की रस्ता चुकलो की काय आणि तितक्यात ढग थोडेसे बाजूला झाले आणि काही लोकांचा आवाज ऐकू आला. आम्ही हुश्श..करत परत चालायला सुरुवात केली, वाट अतिशय निसरडी झाली होती. पाउस पडत नव्हता पण चालण्याने तुडवल्या गेलेल्या झुडूपांमूळे रस्ता निसरडा झाला होता, तसेच सावरत आम्ही बुधला माचीच्या मोठठ्या दगडापाशी पोचलो, ढगामूळे काहीही दिसत नव्हते, आम्ही मग एक छोटासा पॅच करून बुधल्याच्या दगडापाशी पोचलो आणि मग आता काय बघणार म्हणून परत जायला वळलो. थोडे अंतर पुढे चालून आलो आणि जस्ट मागे वळून पाहीलं आणि स्तंभित झालो, २ मिनिटस वाटलं की च्यायल स्वित्झरलँडला आलो की काय!!!

मी आणि मक्या




बुधला माचीवरील काही दृश्ये

वारा वाहत होता आणि ढगांचे पडदे दुर सारू लागला. ते सुंदर दृश्य मी शब्दामधे वर्णन करून नाही सांगू शकत. बुधल्याचा दगड अस्पष्ट दिसू लागला, कापूस उडावा तसे ढग अजून बाजूला झाले आणि बुधलामाची दिसू लागली, आम्ही लगेच ते सुंदर क्षण कायमचे डिजीटाइज करून घेतले. ती आणि अशीच अनेक सुंदर दृश्ये साठवत आम्ही मेंगाई देवी मंदिराजवळ परत आलो. एव्हाना ३ वाजले होते, गडावरून अक्षरश: पाय निघतच नव्हता, मोठया मुश्किलीने आम्ही गडावरून उतरायचा निर्णय घेतला. जड मनाने आम्ही खाली उतरू लागलो, शरीर खाली-खाली उतरत होते, पण आमचे मन मात्र तोरण्यावरच ढगांसारखे त्या फुलांवर तरंगत राहिले होते.

खेड-शिवापूर रस्त्यावर दिसलेली सुंदर संध्याकाळ

बाकिचे फोटोज येथे पहा:-


Labels: , , , , , , , , ,

2 Comments:

At 9:30 PM, Blogger JustRead said...

विनीत
हा ब्लॉग वाचून एकदम मी पण तोरान्यावर आहे की काय असे वाटले ............. तू फार भारी आहेस असा एकटा कसा जातोस नेहा(अनुष्का) ला सोडून ?????
आता पुढचा कोणता गड सर करायचा आहे ?

-सोनाली

 
At 3:41 PM, Blogger Rasal Consultancy said...

बिनी दरवाजा, याचा नेमका अर्थ सांगाल का?
बिनी म्हणजे काय ? त्याची रचना, महत्व यांची माहिती द्यावी हि नम्र विनंती

 

Post a Comment

<< Home